Wednesday, July 2, 2025

आणि हे सगळं असेल तर

पृथ्वी एक ग्रह आहे. माणूस एक प्राणी आहे. पृथ्वीचा भूभाग वेगवेगळ्या देशांमध्ये वाटला गेला आहे. भारत एक देश आहे. माणसं पृथ्वीच्या गाभ्यातून खाणकाम करून धातु काढतात. काही देशात काही धातु तर इतर देशात इतर धातु सापडतात. पर्वतांमध्ये नद्यांचा उगम होतो. महाराष्ट्रात भीमा नदीचा उगम होतो. पंढरपूरजवळ ती चंद्रभागा होते. महाराष्ट्रात कापसाची शेती होते. कापूस साफ करून पिंजून त्याचा दोरा तयार केला जातो.

खाणींमधून आलेले धातु सुद्धा साफ केले जातात. मग ते वितळवले जातात. एकत्र केले जातात. साच्यात टाकले जातात. त्यातून वस्तु तयार होतात. पंढरपूरच्या वेशीजवळ देगांव आहे. तिथे वीटभट्टया आहेत. ओतारी समाजाचे काही कारागीर पिढ्यानुपिढ्या तिथे कार्यरत आहेत. वस्तु तयार करत आहेत. या वस्तु विशिष्ट प्रकारच्या आहेत. धातुच्या दोन लहान वाट्या बनतात. कापसाच्या दोराने त्या जोडल्या जातात. या वस्तूला टाळ म्हणतात. टाळ हे एक वाद्य आहे. वाद्यातून सुर व ताल उमटवता येतात. त्यातून संगीत तयार होतं. याने माणसाला सुख प्राप्त होतं. काहीतरी गवसल्यासारखं वाटतं. कुठेतरी पोचल्यासारखं. नक्की काय वाटतं हे सांगणारा अचूक शब्द अजून माणसं शोधतायत. कधीकधी या भावनेला दैवी असंही म्हणलं जातं.

जसा टाळ आहे तसाच मृदंगही आहे. तोही असाच तयार झाला. असलेल्या गोष्टींपासून. लाकूड आहे. कुठूनतरी चामडी आली. मग कारागीर आले. अशाच इतर गोष्टी. वस्तू, पदार्थ. आणि आपण सगळेच. जे आहोत. उत्पत्ति आहे. असणार्‍या गोष्टीच असणार्‍या गोष्टी तयार करतात. पण यासोबत नसणाऱ्या गोष्टींची सुद्धा निर्मिती चालू असते. कधीकधी तर नसणाऱ्या गोष्टी अजून नसणाऱ्या गोष्टी बनवतात. विश्वास लागतो. विश्वास असला की सगळं असतं. मग पुन्हा तेच. एक आहे म्हणून पुढचं. असणारं काय आणि नसणारं काय. दोन्ही आहेच.

या सगळ्याबरोबर काळ आहे. काळाला समजून घेण्यासाठी माणसांनी काही पद्धती शोधल्या आहेत. वर्ष आहेत. महिने आहेत. स्मृति आहे. इतिहास आहे. पुरातत्व खातं आहे. उत्खननं आहेत. जे आहे ते सगळं कुठून आलं? हे असंच का? याची उत्तरं शोधायच्या प्रयत्नात माणसं बरीच ताकद खर्च करतात. त्या प्रयत्नातून आलेल्या असल्या-नसलेल्या गोष्टी आहेत. उत्तरं शोधण्याच्या तार्किक प्रयत्नांना विज्ञान म्हणतात. धर्म आहेत. Religions आहेत. श्रद्धेतून, भक्तीतून उभ्या राहिलेल्या परंपरा आहेत. देव नाहीये म्हणणाऱ्यांना अजून पूर्ण विश्वासाने हे विधान मांडता आलेलं नाही. विज्ञानाकडे तर्क आहे पण उत्तर नाही. पण देव आहे म्हणणाऱ्यांनाही देव अजून सापडलेला नाही. दोघांना त्यांची बाजू अगदीच स्वाभाविक वाटते. माणसं दोन्ही मार्गांनी एकाच ठिकाणी पोचतील का याचं उत्तर नाही. प्रश्न मात्र आहे.

देव आहे की नाही माहीत नाही. पण काळ आहे.  पृथ्वी आहे. माणूस आहे. पिढ्या आहेत. परंपरा आहेत. अशाच परंपरांपैकी एक वारी आहे. दरवर्षी आहे. भारतात, महाराष्ट्रात, आळंदी आहे. पंढरपूर आहे. देहू सुद्धा आहे. मध्ये अडीच-तीनशे किलोमीटर आहेत. भक्ती मार्ग आहे. लाखो वारकरी आहेतं. वारकरी संप्रदाय आहे. त्यांचं मंडळ आहे. त्यांची भक्ती आहे. या भावना ही सगळी नावं द्यायच्या आधीपासून आहेत. यातच तो मघाशी तयार झालेला टाळही आहे. मृदंग आहे. त्याचा घुमणारा आवाज आहे. टाळांचा गजर आहे. रस्ता आहे. तो व्यापून टाकणारी दिंड्यांची रूंद व लांबलचक रांग आहे. आरत्या, भजनं, अभंग आहेत. पालखी आहे. पादुका आहेत. बुक्का आहे. टिळा आहे. रिंगण आहे. मुक्काम आहेत. शेवटी तिथे पोचल्यावर चंद्रभागाही आहे. त्याकाठी विठ्ठलाचं मंदिर आहे. आणि आत वि‍टेवर उभा असलेला विठ्ठलही आहे. तो दगड की मूर्ती? विश्वासावर ठरेल. कारण हे सगळं ज्यावर उभं तो माणसाचा विश्वास नक्की आहे. श्रद्धा आहे. भक्ती आहे. आस आहे. आणि या शब्दात बांधून फिक्या पडलेल्या अमूर्त भावनांना मूर्त रूपात आणणारी अशी ही वारी आहे. असण्या-नसण्यातून तयार झालेली ही असलेली गोष्ट आहे.

आणि हे सगळं असेल, तर..

No comments:

Post a Comment